नाशिक – संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत म्हणजे श्री खंडोबा. आज पासून गुरुवार २४ पासून खंडोबा षडत्रोत्सव सुरू होत आहे. सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवासाठी सर्व मंदिरे सज्ज झाली असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
नाशिक शहरा जवळील ओझर येथे खंडोबाची सर्वात मोठी यात्रा भरते. तसेच रामकुंडावरील असलेल्या खंडोबा मंदिर येथे चंपाषष्ठीला यात्रा भरते. तसेच देवळाली येथे असलेल्या खंडोबा टेकडी येथे १२ गाड्या ओढल्या जातात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजे हळद याला फार महत्त्व आहे. चंपाषष्ठीला खंडोबाचा कुलधर्म केला जातो. या दिवशी भाविक तळी भरून देवाची आरती करतात. देवाला पुरणपोळी भरीत इत्यादी नैवेद्य दाखवतात.
देवदिवाळी – कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते. कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचीही वर्षातून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. ते या दिवशी केले जाते.
आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता अन् गावातील अन्य मुख्य आणि उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविला जातो.