महाशिवरात्र भगवान शिव
महाशिवरात्र भगवान शिव

असे घ्या शिवपिंडीचे दर्शन 

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.


उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग आणि तीव्रता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो. शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र समजून घेऊ.

शिवाला बेल कसा वहावा ?

बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिव-तत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिव-तत्त्वाचा लाभ होतो. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे शिवाला बेल वाहातांना तो उपडा वाहावा. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर  शिव संतुष्ट होतो. बेलाची पाने तारक शिव-तत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते.

प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

माहिती संदर्भ – सनातन संस्था