Mumbai High Court Orders Release of Juvenile Accused from Correctional Home
Mumbai High Court Orders Release of Juvenile Accused from Correctional Home

मुंबई – ‘पुणे येथील हिट अँड रन म्हणजे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून साेडण्यात यावे’, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २५ जून या दिवशी दिला आहे. याविषयी अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन तरुणाने पोर्शे कारने २ तरुणांना चिरडून मारले होते. या प्रकरणी आरोपीसह त्याचा बचाव करणार्‍या अन्य व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. या अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधिया यांचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि मृत तरुणी अश्विनी कोष्टा यांचे वडील सुरेश कोष्टा यांनी २४ जून या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी ‘संबंधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, तसेच ही घटना दुर्दैवी असून दोषींना कठोर शासन केले जाईल’, असे आश्वासन पालकांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.