Nashik News Updates Be prepared to avoid possible mishaps during monsoon
Nashik News Updates Be prepared to avoid possible mishaps during monsoon

नाशिक – मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क राहून नियोजनबद्ध आराखडा तयार ठेवावा. संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा. आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा सज्ज व अद्ययावत ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढाव बैठकीत दिल्या.

बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर प्रवीण धत, नाशिक महानगरपालिकेचे अपर आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, कळवण सुरगाणाचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे. संभाव्य आपत्तीच्या काळात संपर्काच्या आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असून, सर्व संबंधित विभागांनी आपत्ती काळातील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. महानगरपालिकेमार्फत रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. तयार करून आपत्ती व्यवस्थापन काळात सर्व विभागांनी समन्वयाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी.