सोमवारपासून शाळा सुरू होणार

29

मुंबई – राज्यातील शाळा येत्या २४ जानेवारी सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबईत त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. करोनाची तिसरी लाट येणार असल्याने व करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील शाळा पुन्हा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरत असून स्थानिक प्रशासनाला याची जबादारी देत राज्यातील शाळा २४ जानेवारी पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गायकवाड यांनी सांगितले की शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन एकंदरीत फाईल काल मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली होती. त्यामध्ये शाळा सोमवारी सुरू करा अशी आम्ही विनंती केली होती. ती विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. येत्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात प्राथमिक वर्गासह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी आहे त्याठिकाणी नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील. रुग्ण संख्या जास्त असेल तिथे स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे.