भारत पारतंत्र्यात असतांना ६ जानेवारी १८१२ या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘पोंभुर्ले’ येथे झाला. नोकरीसाठी केलेला किरकोळ अर्ज स्कॉटलंडच्या विश्वविद्यालयातील संग्रहालयात ठेवण्यात यावा, एवढे प्रभावीपणे सूत्रे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा थोडक्यात परिचय येथे देत आहोत.

जन्मजातच अफाट बुद्धीमत्ता आणि दांडगे पाठांतर असलेले बाळशास्त्री स्वतः शिकत असलेल्या इयत्तेतील पुस्तके समजून घेण्यासह पुढच्या २ इयत्तांमधील पुस्तकांचाही ते अभ्यास करत. तल्लख बुद्धीमत्तेमुळे ते ‘बालबृहस्पती’ म्हणून ओळखले जात. सखोल अभ्यासामुळे वयाच्या १४ व्या वर्षी ‘मुंबई एज्युकेशन सोसायटी’ या ते स्वतः शिकत असलेल्या इंग्रजी शाळेत ‘गणिताचे शिक्षक’ म्हणून त्यांना पगारी नोकरी मिळाली.

त्यांनी गणिताच्या बुद्धीमत्तेपुरते मर्यादित न रहाता मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगु या भारतीय भाषांसह इंग्रजी, पारशी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि उर्दू या परदेशी भाषांवरही अल्पावधीतच प्रभुत्व मिळवले. समवेतच ते खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या विषयांतही पारंगत झाले. वयाच्या १८ व्या वर्षी बाळशास्त्री ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे उपसचिव (डेप्युटी सेक्रेटरी) झाले. १८३४ या वर्षी ‘एल्फिन्स्टन महाविद्यालया’ची स्थापना झाली. त्या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी साहाय्यक प्राध्यापक ! तेथे गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे अवघड विषय ते शिकवत.

‘एल्फिन्स्टन महाविद्यालया’त रुजू होण्यापूर्वी त्यांनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी ‘दर्पण’ हे द्विभाषिक वर्तमानपत्र मुंबईत चालू केले. त्यापूर्वी वर्ष १७७९ पासून ‘बाँबे हेरॉल्ड’ हे महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते; परंतु मराठी भाषेतील ‘दर्पण’ हेच पहिले वृत्तपत्र बनले. पानावर एका बाजूला इंग्रजी आणि दुसर्‍या बाजूला मराठी लिखाण अशा दोन भाषांतील हे वृत्तपत्र होते. जांभेकर यांचे वर्गमित्र भाऊ महाजन हे वृत्तपत्रातील इंग्रजी भाग संपादित करत. आरंभी ‘दर्पण’ हे पाक्षिक होते आणि ४ मासांनंतर ते साप्ताहिक बनले. ‘दर्पण’चा खप (विक्री) ३०० प्रती इतका अत्यल्प असला, तरी त्या काळात इतर प्रथितयश वृत्तपत्रांचा अधिकतम खप ४०० प्रती इतकाच होता. ‘दर्पण’मुळे मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रचली गेली. पहिले मराठी पत्रकार होण्याचा मान अर्थात्च आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिळाला. ते ‘दर्पणकार’ या नावाने आजही ओळखले जातात आणि त्यांचा जन्मदिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘दर्पण’ बंद झाल्यावर त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक काढले. हेसुद्धा ‘दर्पण’प्रमाणेच इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत विभागलेले होते. बाळशास्त्री यांच्या दूरदृष्टीमुळे पुढे मराठी वृत्तपत्र समूहाने आकार घेतला.

बाळशास्त्री ‘दिग्दर्शन’ मासिकामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास या विविध शाखांतील विषयांवर मार्गदर्शन करत. बाळशास्त्रींनी वृत्तपत्रापुरते मर्यादित न रहाता विविध विषयांवर पुस्तकेही लिहिली. ‘महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळा’साठी इतिहास, भूगोल, गणित, छंदशास्त्र, नीतीशास्त्र या विषयांवर विविध भाषांतील शालेय पाठयपुस्तकांची निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘बालव्याकरण’ सारखी मराठी पाठ्यपुस्तके सर्वप्रथम त्यांनी बनवली, तसेच उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणितातील ‘डिफरेन्शल कॅलक्युलस’ (Differential calculus) सारख्या अवघड विषयावर आधारित ‘शून्यलब्धीगणित’ हे पहिले पुस्तक लिहिले.

शैक्षणिक क्षेत्रातून आध्यात्मिक क्षेत्रात पाऊल टाकत वर्ष १८४५ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘ज्ञानेश्वरी’चे पाठभेदांसहित संपादन करून ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत जगाला उपलब्ध करून दिली. त्यामुळेच त्यांना ज्ञानेश्वरीचे ‘आद्यप्रकाशक’ म्हणून ओळखले जाते. कोकणातील गावागावांत जाऊन विविध भाषांमधील उपलब्ध ताम्रपटांचे वाचन करून इतिहास लेखन करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. या कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे ‘आद्य इतिहासकार’ म्हटले जाते.

हिंदु धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले आचार्य बाळशास्त्री धर्मांतर करणार्‍या प्रवृत्तीच्या विरोधात होते. त्यांच्या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे. ते प्रकरण असे –

अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना दोन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मात घेतले. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्याच मार्गावर निघाला होता. बाळशास्त्रींना याची माहिती मिळताच त्यांनी श्रीपतीला गाठले. न्यायाधीश पेरी यांच्याद्वारे त्याचा ताबा घेतला आणि त्याचे मनपरिवर्तन केले. त्याची सहमती मिळताच काशी येथे नेऊन शुद्धी करून त्याचा हिंदु धर्मात प्रवेश करवून घेतला; परंतु त्यानंतर त्यांच्यावर या कृत्याविषयी कडाडून टीका झाली. ५७ दिवस यवनांकडे राहिलेल्या हिंदु व्यक्तीला पुन्हा धर्मात आणल्याबद्दल पुण्यात त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता.

बाळशास्त्री तत्त्वाचे पक्के होते. मुंबई विभागाचे ‘शाळा निरीक्षक’ म्हणून नियुक्ती झाली असतांना एकदा वेतनात त्यांना १ रुपया अधिक दिला गेला. ही गोष्ट त्यांनी संबंधित ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्याकडे कळवली आणि पुढील मासात तो एक रुपया अल्प देण्याची विनंती केली. (आज कितीजण असा प्रामाणिक प्रयत्न करतात ? – संपादक) यानंतरही पुढील मासात तो वाढीव रुपया वळता केला गेला नाही. असे ४ मास झाल्याने बाळशास्त्री जांभेकर यांनी अधिकार्‍यांना खरमरीत पत्र लिहून ‘जोपर्यंत तुम्ही मला दिलेला अधिकचा रुपया जमा करून घेत नाही, तोपर्यंत मी वेतन घेणार नाही’, अशी तंबीच दिली. या त्यांच्या पत्रामुळे अधिकारीच आश्चर्यचकित झाले !

बाळशास्त्री यांनी अनेक पदे भूषवली. शिक्षक ‘ट्रेनिंग स्कूल’चे ते संचालक होते. त्यांनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून काम पाहिले. वर्ष १८४० मध्ये त्यांना ‘जस्टीस ऑफ पीस’ (न्यायाचा शांतीमित्र) ही पदवी देण्यात आली. याद्वारे तंटे सोडवण्याचे कायदेशीर उत्तरदायित्व त्यांना मिळाले. ‘विद्यामुकुटमणी’, पश्चिम भारतातील ‘आद्यकृषी’ अशा विविध पदव्या लोकांनी त्यांना दिल्या. प्रतिष्ठित ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या नियतकालिकांमध्ये आचार्य बाळशास्त्री यांचे लेख प्रसारित होत. असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते. नामवंत एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापक पदासाठी बाळशास्त्रींनी केलेला अर्ज स्कॉटलंडच्या विश्वविद्यालयातील संग्रहालयात आजही ठेवलेला आहे.

दुर्दैवाने आचार्य बाळशास्त्री अल्पायुषी ठरले. १८ मे १८४६ या दिवशी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी येताच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने न्यायालयाचे कामकाज स्थगित करून त्यांना मानवंदना दिल्याची नोंद आहे. बाळशास्त्री यांचे कार्य अफाट आहे. ‘दर्पण’मुळे ते थोडेफार चर्चेत आले; परंतु ते दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या विविधांगी कार्याची नोंद मात्र भारतीय जनतेने घेतलेली दिसत नाही.

लेखक : योगेश पवार

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात