राष्ट्रीय विज्ञान दिवस

11

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

कोरोना काळात संपूर्ण जगात लसीचा तुटवडा असताना भारताने आत्मनिर्भर अवलंबत स्वतः कोव्हीड लस निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आणि लस निर्माण करून दाखवली. भारतामध्ये होत असलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळेच हे शक्य झाले. 1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

संदर्भ – विकासपीडीया संकेतस्थळ