News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्‍यात येणार असून अभ्‍यागतांना (अभ्‍यागत म्‍हणजे मंत्रालयात येण्‍यास इच्‍छूक) प्रवेश मिळण्‍यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्‍यावी लागेल. ज्‍या विभागामध्‍ये काम आहे, त्‍याच मजल्‍यावर अभ्‍यागतांना प्रवेश देण्‍यात येणार आहे. पिशवी, बॅग किंवा १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम मंत्रालयात नेता येणार नाही. अभ्‍यागतांच्‍या संख्‍येवरही नियंत्रण आणण्‍यात येणार आहे. गृह विभागाने मंत्रालय प्रवेश आणि सुरक्षा यांचे नवे नियम नुकतेच घोषित केले असून ते १ मासात लागू केले जातील.

१. मंत्रालयात २५ विभाग असून त्‍यांचे टपाल मंत्रालयाच्‍या प्रवेशद्वारात द्यावे लागणार आहे.

२. मंत्रालयात प्रतिदिन सुमारे ३ सहस्र ५००, तर मंत्रीमंडळ बैठकीच्‍या दिवशी ५ सहस्र अभ्‍यागत येतात. मंत्रालयाच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारातून मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री आणि मंत्री यांचीच वाहने येतील. सनदी अधिकार्‍यांच्‍या गाड्या सचिव प्रवेशद्वारातून, तर आमदार आणि इतरांची वाहने बगीचा प्रवेशद्वारातून आत येतील.

३. कर्मचार्‍यांचे जेवणाचे डबे वगळता बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्‍यास प्रतिबंध असेल.

४. ‘मेट्रो सबवे’मध्‍ये कर्मचारी आणि अभ्‍यागत यांच्‍या पडताळणीसाठी कक्ष उभारला जाईल. आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्‍या समवेत येणार्‍या अभ्‍यागतांनाही प्रवेश पासाचे बंधन असेल.

५. मंत्रालयाच्‍या छतावर जाण्‍याचे सर्व मार्ग बंद करण्‍यात येणार आहेत. खिडक्‍या आणि सज्‍जा येथून उड्या मारण्‍याचे प्रकार बंद करण्‍यासाठी यंत्रणा लावण्‍यात येणार आहेत.