22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील शांततामय पर्यटनस्थळ पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. TRF या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
या पार्श्वभूमीवर भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली असून, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि TRFसारख्या संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत दोन महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कर्नल कुरेशी यांनी सांगितले की, “या कारवाईचा उद्देश दहशतवादी अड्ड्यांचा नाश करण्याचा होता. आम्ही विशेष काळजी घेतली की कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहोचू नये.” विंग कमांडर सिंग यांनी स्पष्ट केलं की हल्ले अत्यंत अचूक होते आणि केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केलं गेलं.
परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सांगितले की, “पहलगाम हल्ला हा भारताच्या प्रगतीविरोधात रचलेलं षड्यंत्र होतं. जम्मू काश्मीरमधील पर्यटन आणि अर्थव्यवस्था पाकिस्तानला खटकत असल्याने त्यांनी हा हल्ला घडवून आणला.”
ही कारवाई अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनी लक्ष्यांची खात्री केल्यानंतर हल्ल्याची अचूक वेळ आणि दिशा ठरवण्यात आली होती. लष्कराच्या माहितीनुसार, सर्व 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, कोणत्याही लष्करी ठिकाणी किंवा नागरिकांवर हल्ला झालेला नाही.
या कारवाईमुळे पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, तो दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड करणार नाही. शांततेच्या मार्गावर असलेला भारत, आपल्या सुरक्षेसाठी कोणतंही कठोर पाऊल उचलायला मागे-पुढे पाहणार नाही.