भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना युद्धजन्य परिस्थितीचा सराव म्हणून मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार ७ मे रोजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ही मॉक ड्रिल राबवली जाणार आहे.
या ड्रिलचा उद्देश म्हणजे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण देणे आणि नागरी संरक्षण यंत्रणांना अधिक सक्षम बनवणे. देशात याआधी अशा स्वरूपाची मॉक ड्रिल १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी झाली होती.
या मॉक ड्रिलमध्ये काय होणार?
सायरन वाजवले जाणार
नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्याची प्रात्यक्षिके
महत्त्वाच्या इमारतींवर (पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, बाजारपेठा) सायरन
कोण-कोण सहभागी होणार?
जिल्हाधिकारी, पोलिस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड्स, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्राचे सदस्य सहभागी होतील.
मॉक ड्रिल होणारी ठिकाणं:
मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक जिल्ह्यातील ३ ठिकाणी सराव:
नाशिक, मनमाड, सिन्नर येथे विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाची बैठक सुरू:
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मंत्रालयात सुरू असून, संचालक सतीश खडके यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला जात आहे.
सार्वजनिक सूचना:
नागरिकांनी मॉक ड्रिलदरम्यान घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे संचालक प्रभात कुमार यांनी केले आहे.










