उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारतातील अनेक भागांत सध्या गारठा वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होत असून त्यामुळे येथील किमान तापमानात घट झाली आहे. ही स्थिती आणखी ४८ तास कायम राहून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर पश्चिमी प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.