
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) सध्या ‘प्रोजेक्ट विष्णु’ (project-vishnu)अंतर्गत प्रगत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर काम करत आहे. ही क्षेपणास्त्रे जगातील अत्यंत वेगवान आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. यामुळे भारत लवकरच अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यासारख्या तंत्रज्ञान-सक्षम देशांच्या यादीत सामील होणार आहे.
१२ हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे एकाच वेळी विकसित
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश एकाच वेळी १२ वेगवेगळ्या प्रकारची हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तयार करणे हा आहे. ही क्षेपणास्त्रे ८ मॅक म्हणजे सुमारे ११,००० किमी प्रति तास वेगाने धावू शकतात. अशा वेगवान क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने भारताची रणनीतिक क्षमता आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणातील स्थान अधिक बळकट होणार आहे.
इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीमची निर्मिती
या योजनेत इंटरसेप्टर मिसाईल सिस्टीम तयार केली जात आहे, जी शत्रूच्या क्रुझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करू शकते. ही प्रणाली भारताला भविष्यातील आक्रमणांपासून अधिक सुरक्षित बनवणार आहे.
रडारला चकवा देणारी आणि लक्ष्य बदलणारी तंत्रज्ञान
विशेष बाब म्हणजे ही क्षेपणास्त्रे लक्ष्यावर झेपावल्यावर देखील दिशा बदलण्याची क्षमता ठेवणार आहेत. तसेच, ती शत्रूच्या रडार सिस्टीम्सला चकवा देऊ शकतात, ज्यामुळे या क्षेपणास्त्रांचं ट्रॅकिंग करणे अत्यंत कठीण होईल.
‘प्रोजेक्ट विष्णु’ हे भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रं आणि इंटरसेप्टर सिस्टीमद्वारे भारताची सुरक्षितता आणि जागतिक सामर्थ्य यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.