विवाह पंचमीच्या शुभ दिवसानिमित्त आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर पहिला भगवा धर्मध्वज फडकावण्यात आला. मंत्रोच्चार आणि वैदिक विधीच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संपूर्ण परिसर ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विवाह पंचमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान श्री राम आणि देवी सीता यांचा विवाह झाल्यामुळे या तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळेच या दिवशी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिखरावर फडकावण्यात आलेला ध्वज 10 फूट उंच आणि 20 फूट लांब असून त्याचा आकार काटकोन त्रिकोणी आहे. या ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेज आणि पराक्रमाचे प्रतीक असलेला तेजस्वी सूर्य, कोविदार वृक्षाची प्रतिमा आणि ‘ॐ’ असे पवित्र चिन्ह कोरलेले आहे. हा ध्वज धर्म, शक्ती व अध्यात्म यांचे प्रतीक मानला जातो.






