तेल अविव (इस्रायल) – इस्रायल-हमास युद्धावर लगाम लावण्यासाठी नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता देण्याची औपचारिक घोषणा केली आहे. या देशांकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याविषयीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्रायल संतापला असून त्याने या देशांमधून त्याचे राजदूत परत बोलवले आहेत.
पॅलेस्टाईनला मान्यता, म्हणजे आतंकवादाचा पुरस्कारच ! – इस्रायल
या निर्णयावर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ म्हणाले की, पॅलेस्टाईनला नॉर्वे आणि आयर्लंड यांसारख्या देशांनी मान्यता देणे, म्हणजे आतंकवादाचा पुरस्कार करण्यासारखेच आहे. आमचे सार्वभौमत्व झुगारणार्यांविरुद्ध इस्रायल गप्प बसणार नाही.
कॅटझ पुढे म्हणाले की, पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या निर्णयामुळे गाझामधील ओलिसांच्या परतीच्या प्रयत्नांना आणि युद्धबंदीला हानी पोचू शकते. आमच्या नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवणे, हमासचे समूळ उच्चाटन करणे आणि ओलिसांची सुटका करणे, हे आमचे प्राधान्य आहे.
पॅलेस्टाईनला जगातील १४० देशांची मान्यता !
पॅलेस्टाईनला जगातील १४० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे; परंतु अनेक युरोपीय देश आणि अमेरिका यांनी अद्याप ती दिलेली नाही. यामुळेच पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य होऊ शकला नाही. भारताने पॅलेस्टाईनच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे.