इन्फल्युएंझा आजारावर तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजारा विषयीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आज विधान भवन येथे घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनासह नागरिकांनाही सूचना दिल्या आहेत.

इन्फल्युएंझा विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A, B आणि C असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1N1, H2N2, H3N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात.

आजारी व्यक्तीनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. खोकला असल्यास मास्क वापरावा. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी खोकला ताप अंगावर काढु नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा सूचना त्यांनी दिल्या.

भारतात H3N2 इन्फ्ल्यूएंजा व्हायरसचे (H3N2 Influenza Virus) रुग्ण वेगाने वाढतायत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे वृत्त आहे. कोरोना आणि H3N2 या दोन्ही प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे H3N2 चे वाढते रुग्ण यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.