नाशिक – नाशिक महापालिकेला 6 हजार 300 दलघफू पाण्याचे आरक्षण नाकारले असून 5300 दलघफू पाणी महापालिकेला मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागत आहे. गंगापूर धरणातील मृत पाणीसाठा वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असली, तरी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याने यंदा शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.
नाशिक शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेने गंगापूर धरणात खंदक खोदण्याची प्रक्रिया सुरू करून सर्वेक्षणासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र, त्याकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने निविदा सात दिवसांनी वाढविण्याची वेळ आली आहे. नाशिक शहरासाठी हा महत्त्वाचा मुद्दा असून सर्वेक्षणाला जितका उशीर होईल, तितकाच खंदक खोदकामालाही विलंब होणार आहे. नाशिककरांवरील पाणीटंचाईचे ढग गडद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण ४९ टक्के भरल्याने नाशिकमधील गंगापूर आणि दारणा गटातून एकूण तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने जलसंपदा विभागाकडून मागितलेले 6300 दलघफू पाणी आरक्षण फेटाळण्यात आले आणि 5300 दलघफू पाणी महापालिकेला मंजूर करण्यात आले. शहराला 31 जुलैपर्यंत तहान भागवण्यासाठी 5800 दलघफू पाण्याची गरज आहे. त्यामुळे मागणीच्या पाण्याचा 500 दलघफू टंचाई आहे.