आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान आहे. त्या निमित्ताने…

वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशांमध्ये प्रचलित असलेला एक वैष्णव संप्रदाय आहे. ‘वारी करणारा तो वारकरी’ होय. ‘वारी’ शब्दाच्या अनेक व्युत्पत्या अनेक विद्वानांनी दिल्या आहेत. ‘वारी’ हा शब्द ‘फेरी’ किंवा ‘खेप’ या अर्थाने आहे.

संत ज्ञानदेवांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता; मात्र या पंथाला तात्विक आणि आध्यात्मिक अधिष्ठान ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ‘राम कृष्ण हरि’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. पंढरपूर आणि आळंदी अशा दोन वार्‍या वारकरी संप्रदायात चालतात. पंढरीची वारी सर्वांत महत्त्वाची ! ती आषाढ शुक्ल एकादशी ही होय. आळंदीच्या वारीचा दिवस कार्तिक कृष्ण एकादशी हा आहे. आषाढीच्या वारीस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीस येते. आषाढी-कार्तिकी या वार्‍यांना प्रत्येक फडावर दशमी ते पौर्णिमा भजने आणि कीर्तने होतात. रात्री हरिजागर असतो. पौर्णिमेस सर्व दिंड्या पंढरपुरापासून जवळ असलेल्या गोपाळपुरीस जातात. तिथे काला होतो. काल्याच्या लाह्या एकमेकांच्या मुखी घालून वारकरी आपल्या वारीची सांगता करतात. या वेळी स्पृश्य-अस्पृश्य भेद मानला जात नाही. आळंदीच्या वारीस पंढरीहून संत नामदेव आणि संत पुंडलिक या संतांच्या पालख्या अन् दिंड्या येतात. भजन, कीर्तन, हरिजागर हे सोहळे होतात. कार्तिक कृष्ण त्रयोदशी हा ज्ञानेश्वरांचा समाधीदिन होय. या दिवशी समाधीची भजने म्हटली जातात आणि काला होतो. देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, सासवड इत्यादी संतसंगी त्या त्या संतांच्या पुण्यतिथीला नियमाने जाणारेही वारकरी असतात.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात