आमंत्रण आणि निमंत्रण यांमध्ये नेमका भेद काय ?

11

सध्या सगळीकडे लग्नसराईचा काळ आहे. सर्वांच्याच घरी लग्नाच्या पत्रिका जवळपास वर्षभर येत असतात; ज्यात ‘आग्रहाचे निमंत्रण’ किंवा ‘आमंत्रण’ असे लिहिलेले असते. आपण त्यातील लग्नाची किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाची वेळ आणि दिवस पाहून पत्रिका बाजूला ठेवतो; पण यातील आमंत्रण अन् निमंत्रण हे शब्द नेमके कधी ? आणि का वापरले जातात ? याचा विचार कधी केला आहे का ? या दोन्ही शब्दांमध्ये नेमका भेद काय ? त्याचा अर्थ आणि यातील कोणत्या शब्दांचा वापर नेमका केव्हा करावा ? ते जाणून घेऊया.

आमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा ?
जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी किंवा विशिष्ट कार्यक्रमाला बोलावतो; पण या कार्यक्रमाची कोणतीही वेळ ठरलेली नसते. तेव्हा अशा प्रकारच्या बोलावण्याला ‘आमंत्रण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण आपल्या नातेवाइकांना किंवा मित्र-मैत्रिणींना घरी जेवणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बोलवत असतो. त्याची वेळ ठरलेली नसते. ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना शक्य त्या वेळी येऊ शकतात.

निमंत्रण म्हणजे काय आणि हा शब्द कधी वापरावा ?
एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते आणि त्यातील कार्यक्रम एका विशिष्ट वेळीच पार पडणार असतो. या ठिकाणी वेळेचे बंधन असते. अशा प्रकारच्या बोलावण्याला ‘निमंत्रण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ लग्नाची पत्रिका. या पत्रिकेत लग्नाचा मुहूर्त दिलेला असतो आणि पाहुण्यांना त्याच वेळेत त्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन केलेले असते. याखेरीज संस्थांचे वार्षिक कार्यक्रम किंवा असे सर्वच कार्यक्रम ज्यात येणार्‍या पाहुण्यांना वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असते.

संदर्भ – दै. सनातन प्रभात संकेतस्थळ,

साभार : दैनिक ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ