वर्ष २०२३ पर्यंत जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणार्या ‘अंबर’ या संशोधन संस्थेच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे. वर्ष २०१५ मध्ये सौरऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात भारत नवव्या क्रमांकावर होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये भारताने पुष्कळ भर दिल्यामुळेच हे यश मिळाले आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
‘ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू’ नावाच्या या अहवालात ‘अंबर’ने म्हटले की, भारतात वर्ष २०२३ पर्यंत सौरऊर्जेपासून निर्मित वीज ही एकूण वीजनिर्मितीपैकी ५.८ टक्के होती. वर्ष २०२३ पर्यंत भारतातील सौरऊर्जा उत्पादनात झालेली वाढ ही चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांनंतर जगातील चौथी सर्वांत मोठी वाढ होती. वर्ष २०१५ मध्ये भारतातील वीजनिर्मितीमध्ये सौरऊर्जेचे योगदान केवळ ०.५ टक्के होत. याचा अर्थ वर्ष २०१६ ते २०२३ या ८ वर्षांच्या कालखंडात हे प्रमाण ११ पटींहूनही अधिक झाले आहे.
‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या अंदाजानुसार वर्ष २०३० पर्यंत जागतिक स्तरावर सौरऊर्जेपासूनची वीज निर्मिती ही एकूण वीजनिर्मितीपैकी २२ टक्क्यांपर्यंत वाढेल. पुढील ८ वर्षांत ही क्षमता तिप्पट करण्याची योजना असणार्या काही देशांपैकी भारत एक आहे.











