महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर सुरू झाली आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा पार पडत असून विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे बदल यंदा अमलात आणण्यात आले आहेत.

ही परीक्षा पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधून यंदा एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सुमारे ८.२० लाख मुलगे, ७.१२ लाख मुली तसेच १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्यातील १०,६६४ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा ३,३८७ मुख्य परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. शाखानुसार पाहता, विज्ञान शाखेत सर्वाधिक ७,९९,७७३ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. कला शाखेत ३,८०,६९२ विद्यार्थी तर वाणिज्य शाखेत ३,२०,१५२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी देखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

यंदाच्या परीक्षेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रश्नपत्रिका वाचनासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी ११ वाजता प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा वाचन कालावधी दिला जात होता. मात्र, आता ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या १० मिनिटांत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ देण्यात येणार असून हा कालावधी परीक्षेच्या शेवटी वाढवून देण्यात येणार आहे.

पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. या बदलामुळे प्रश्नपत्रिका बाहेर जाण्याची शक्यता कमी होणार असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक सुविधा उपलब्ध करून देताना प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्याची सोय कायम ठेवण्यात आली आहे. तसेच कॉपी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणाची शपथ घेण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) संबंधित शाळांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेली ही परीक्षा शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी प्रशासन, शाळा आणि परीक्षा केंद्रांवर विशेष तयारी करण्यात आली आहे.