मुंबई – कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे. राज्यशासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘चाइल्ड टास्क फोर्स’कडूनही कोरोना नियंत्रित राहिल्यास दिवाळीनंतर शाळा चालू करण्यास सहमती दर्शवली होती. पालक आणि विद्यार्थी वर्ग यांच्याकडूनही अनेक दिवसांपासून शाळा चालू करण्याची मागणी करण्यात येत होती. यापूर्वी शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्याचा दिनांक घोषित करण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेने शाळा चालू करण्याचा निर्णय रहित करण्यात आला. आता पुन्हा शाळा चालू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून कोरोनाविषयीच्या दृष्टीने आवश्यक ती सिद्धता चालू करण्यात आली आहे.