Bangkok, Thailand, Earthquake: थायलंडची राजधानी बँकाॅकमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती आणि बंगले क्षणार्धात जमीनदोस्त झाले.

भूगर्भशास्त्र केंद्राने सांगितले की, हा भूकंप दुपारी 10 किलोमीटर खोलीवर झाला. त्यामुळे जिवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवरील सागिंगजवळ होता. जर्मनीच्या GFZ भूगर्भशास्त्र केंद्र आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, दुपारी झालेल्या भूकंपाची खोली 10 किलोमीटर (6.2 मैल) होती, त्यामुळे जोरदार हादरे बसले.

बँकाॅकमध्ये इमारत कोसळली

भूकंपामुळे बँकाॅकमधील एका निर्माणाधीन गगनचुंबी इमारतीला फटका बसला आणि ती कोसळली. भूकंपानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरलेली स्पष्टपणे दिसून येते.

बँकाॅकच्या उंच इमारती हादरल्या

भूकंपानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता बँकाॅकमधील इमारतींमध्ये अलार्म वाजू लागले. घबराटीमुळे दाट लोकवस्तीतील उंच इमारती आणि हॉटेलमधून लोक बाहेर पडले. इतकेच नाही, तर उंच इमारतींमधील जलतरण तलावांतील पाणीही थरथरू लागले आणि लाटा उसळताना दिसल्या.

म्यानमारमध्येही हादरे

या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या मोनीवा शहराच्या पूर्वेस 50 किलोमीटर (30 मैल) होता. दोन तास आधीच दोन्ही देशांमध्ये हलके भूकंपीय धक्के जाणवले होते. सध्या तरी म्यानमारमध्ये झालेल्या नुकसानीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.