त्र्यंबकेश्वर: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.
विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात या संदर्भात नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर नगरविकास विभाग प्रधान सचिव गोविंद राज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता दिली.
त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा विकासाचा निर्णय का महत्त्वाचा?
पूर्वी १४ स्क्वेअर किलोमीटरच्या ‘क’ वर्ग नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला विशेष तीर्थक्षेत्र दर्जा नव्हता. मात्र, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने हा दर्जा देण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा, त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. श्रीया देवचके, नगरपरिषद अभियंता स्वप्निल काकड व इतर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी हा प्रस्ताव तयार करण्यात आला.
महत्त्वाच्या व्यक्तींचे सहकार्य
या निर्णय प्रक्रियेत त्र्यंबक-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, नगरविकास विभाग सहसचिव विद्या हंपैय्या, जयंत वाणी तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयातील अमोल शिंदे आणि त्र्यंबकेश्वर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पुरोहित मयूर थेटे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने शहराचा विकास वेगाने होण्याची अपेक्षा आहे.