News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदारांना भावनिक साद घालत निवडणुकीत आपला विश्वास व्यक्त केला आहे.

“ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांवर पूर्ण विश्वास दाखवला. बारामतीतील जनतेच या निवडणुकीची सूत्रे हातात घेऊन मोठ्या मताधिक्याने आपल्याला विजय मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी ‘दादा’ यांच्या कार्याची आठवण करून देत, त्यांच्या नंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याचे नमूद केले. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे बारामतीकरांसाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितले की, दादांनी घालून दिलेल्या विकासाच्या मार्गावर चालत बारामतीचा सर्वांगीण विकास साधण्याचे आपले ध्येय आहे. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

६ एप्रिल रोजी त्यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.

बारामती पोटनिवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून, भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काळात ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.