News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

टोकियो (जपान) – भारत आणि अमेरिका यांच्यानंतर आता चीनचे हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे फुगे, म्हणजेच ‘स्पाय बलून’ जपानच्या आकाशात दिसले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये हे फुगे जपानमध्ये दिसले होते, मात्र त्याची छायाचित्रे आता प्रथमच समोर आली आहेत. ‘बीबीसी पॅनोरामा’ने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानावर कार्यरत एका आस्थापनाच्या साहाय्याने जपानमध्ये अशा अनेक चिनी फुग्यांची उपग्रह छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अशा प्रकारचे चिनी फुगे याआधी अमेरिकेतही दिसले होते.

बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानावर कार्यरत असणार्‍या या आस्थापनाचे मालक कोरी जसकोल्स्की यांनी सांगितले की, हे फुगे उत्तर चीनमधून सोडण्यात आले आहेत. हे फुगे पूर्व आशिया पार करतांना दिसले. असे फुगे अत्यंत मोठ्या आकाराचे असतात आणि माहिती गोळा करण्यासाठी उपकरणांनी सुसज्ज असतात. जपानच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारे युको मुराकामी म्हणाले, ‘‘जपान सरकार अशा प्रकारच्या फुग्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. आवश्यकता पडल्यास देश आणि नागरिक यांच्या रक्षणासाठी ते नष्ट केले जातील.’’

सौजन्य – WION

माजी ‘सीआयए’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेतील विश्‍लेषक जॉन कल्व्हर यांनी बीबीसीला सांगितले, ‘‘चीन गेल्या ५ वर्षांपासून अशा प्रकारच्या फुग्यांचा वापर करत आहे. हे फुगे अनेकदा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत रहातात. हा एका दीर्घ मोहिमेचा भाग आहे.’’ ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘सीआयए’ने असेही म्हटले होते की, चीन हेरगिरीसाठी वापरण्यात येणार्‍या फुग्यांद्वारे चीन जगभरातील देशांच्या सैनिकी केंद्रांवर लक्ष ठेवत आहे. चीन गेल्या अनेक वर्षांपासून हे करत असून त्याने आतापर्यंत १२ देशांमध्ये असे फुगे पाठवून गोपनीय माहिती गोळा केली आहे. तैवानच्या परिसरातही असेच फुगे दिसले आहेत.