आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या वर्षी आषाढी एकादशी २९ जून २०२३ ला आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.
कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो.
व्रत करण्याची पद्धत
> आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे.
> एकादशीला प्रातःस्नान करायचे.
> तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे.
> हा संपूर्ण दिवस उपवास करायचा
> रात्री हरिभजन करत जागरण करायचे.
> आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे.
> या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

पंढरपूरची वारी
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे.
संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो. पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.
पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व !
विठुरायाच्या नामगजरात निघणार्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे. – श्री. श्रीकांत भट, अकोला.
पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते ! वारकर्यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते !
भावभक्तीची अनुभूती देणारा पालखी सोहळा !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी ! श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक ! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. वारकर्यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.

आजच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा !
माहिती, छायाचित्र संदर्भ – sanatan.org