बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. १० मे या दिवशी झालेल्या मतदानानंतर १३ मे या दिवशी मतमोजणी करण्यात आली. यात काँग्रेस २२४ जागांपैकी १३५ जागांवर आघाडीवर असून भाजपला केवळ ६३ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी ५५ जागा अधिक मिळाल्या, तर भाजपला ३९ जागा गमवाव्या लागल्या आहेत, असेच चित्र दिसून आले. तिसर्या क्रमांकावर जनता दल (सेक्युलर) पक्ष असून त्याला केवळ २२ जागांवर आघाडी मिळाली आहे. बहुमतासाठी ११३ जागा आवश्यक आहेत. संपूर्ण निकाल आणि विजयी उमेदवार घोषित होण्यास उशीर होणार असल्याने या आकड्यात काही प्रमाणात पालट होऊ शकतो. काँग्रेसला बहुमत मिळाल्याने पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार यावर आता चर्चा चालू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे, तर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, अशीही चर्चा आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बसवराज बोम्माई यांनी निकालावर म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी पुष्कळ प्रयत्न केले, तरीही आम्ही निवडणुकीत अपेक्षित लक्ष्य गाठू शकलो नाही. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू.