मुंबई – मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. मुंबई विद्यापिठाचे हिंदु अध्यासन केंद्र आणि ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन यांविषयी जागृती व्हावी, अशा व्यापक दृष्टीकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ‘मंदिर व्यवस्थापन’ या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे आणि तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल अन् वित्त व्यवहार, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर, तसेच पर्यावरण अन् परिसरपूरक अशा अनुषंगिक विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात ३ मासांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल.