देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. तीन महिन्यांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा त्यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत केली. या निर्णयामुळे देवळाली कॅम्प परिसरातील सुमारे 60 हजार नागरिकांना नगर परिषदेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध होतील.

या निर्णयामागे आमदार सरोज आहिरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. नाशिक महानगरपालिकेने देवळालीच्या समावेशास नकार दिल्यामुळे, आहिरे यांनी देवळालीसाठी स्वतंत्र नगर परिषदेची जोरदार मागणी केली होती.

गत चार वर्षांपासून राज्यातील सातही कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या नागरी सशक्तीकरणाच्या हालचाली सुरू होत्या. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी नाशिक महापालिकेने देवळालीचा समावेश करण्यास नकार दिला.

📌 विशेष पॅकेजची मागणी

आ. सरोज आहिरे यांनी देवळाली नगर परिषदेच्या स्थापनेसाठी वेतन, जागा, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या सेवांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे. नगर परिषद स्थापनेनंतर या भागात विकासाच्या दृष्टीने भरीव निधीची आवश्यकता भासणार आहे.

📣 नागरिकांच्या मागणीला मान्यता

गेल्या दोन वर्षांपासून देवळाली कॅम्पमधील नागरिक मूलभूत सुविधांअभावी त्रस्त होते. नगर परिषदेची मागणी सातत्याने केली जात होती. नाशिक महापालिकेने समावेश नाकारल्याने स्वतंत्र नगर परिषदेची संकल्पना पुढे आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास मान्यता देऊन, तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.