ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी फेसबुकचे ‘थ्रेड’ लाँच

17

मेनलो पार्क (अमेरिका) – ‘मेटा’ या फेसबुकच्या आस्थापनाने ट्विटर या बुद्धीजीवी वर्गामध्ये प्रसिद्ध असलेल्या जागतिक सामाजिक माध्यमाशी स्पर्धा करण्यासाठी ‘थ्रेड’ हे नवे माध्यम चालू केले आहे. फेसबुकने त्याच्या संकेतस्थळावर यावर माहिती देतांना म्हटले आहे, ‘आमचे ‘इंस्टाग्राम’ हे सामाजिक माध्यम छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता त्याचाच पुढील टप्पा म्हणून शब्दांच्या रूपातही तुम्ही तुमचे विचार मांडू शकाल. यासाठी आम्ही ‘थ्रेड’ हे अ‍ॅप चालू करत आहोत.

५०० अक्षरांपर्यंतचा मजकूर आणि ५ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित करता येणार

थ्रेड’ हे सामाजिक माध्यम ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी बनवण्यात आल्याचे तज्ञांचे म्हणणे असून यामध्ये ट्विटरपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी ‘कू’ आणि ‘मास्टोडोन’ ही सामाजिक माध्यमे आधीपासून कार्यरत आहेत; परंतु ‘मेटा’कडून ‘थ्रेड’विषयी केला जाणारा मोठा प्रचार (ब्रॅन्डिंग) ट्विटरला आव्हानात्मक ठरू शकतो. ट्विटरवर विनामूल्य खाते वापरू शकणार्‍या लोकांना अधिकाधिक २८० अक्षरांमध्ये (‘कॅरेक्टर्स’मध्ये) ट्वीट करता येते, तसेच त्यामध्ये अधिकाधिक २ मिनिटे २० सेकंद एवढ्या अवधीचाच व्हिडिओ प्रसारित करता येतो. याच्या तुलनेत ‘थ्रेड’वर ५०० अक्षरांपर्यंतचा मजकूर आणि ५ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित करता येणार आहे.