पणजी (गोवा) – भारताला सीमापार आतंकवादाचा धोका अजूनही कायम आहे. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणे बंद झाले पाहिजे. आतंकवादाचा सामना करणे हे या संघटनेच्या मूळ उद्देशांपैकी एक आहे. आतंकवादाकडे डोळेझाक करणे आमच्या सुरक्षेसाठी हानीकारक ठरेल. आम्हाला ठाम विश्‍वास आहे की, आतंकवादाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सीमेपलीकडील आतंकवादाला खतपाणी घालण्याचे प्रकार बंद करावेत. आतंकवादाशी लढा हे शांघाय सहकार्य परिषदेचे खरे उद्दिष्ट आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे ४ मेपासून चालू झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेत पाकचे नाव न घेतला त्याला फटकारले. या परिषदेच्या बैठकीत पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांची भेट घेतल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी वरील सूत्र उपस्थित केले. या बैठकीला पाकिस्तान व्यतिरिक्त चीन, रशियासह सर्व सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत.

जयशंकर यांनी चीन, रशिया आणि उझबेकिस्तान यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी ४ मे या द्विपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी चर्चेत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील बहुपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री किन गँग यांच्याशीही बैठक घेतली. या चर्चेत प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यावर आणि सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता सुनिश्‍चित करण्यावर भर देण्यात आला. उझबेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सैदोव यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली. ‘द्विपक्षीय भागीदारी वेगवेगळ्या क्षेत्रात वृद्धींगत होईल’, असा विश्‍वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

जयशंकर यांनी बिलावल भुट्टो यांचे स्वागत केले. दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकत्र आल्यावर त्यांच्यात हस्तांदोलन केल जाते. जयशंकर यांनी मात्र भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे टाळले, त्यांच्यात संवाद झाला नाही. जयशंकर यांनी भुट्टो यांना सभेच्या ठिकाणी जाण्याचा इशारा केला.