पुणे येथील डी.आर्.डी.ओ.च्या शास्त्रज्ञाकडून ‘लॅपटॉप’सह ३ भ्रमणभाष जप्त !

7

पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डी.आर्.डी.ओ.) वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याकडून ‘लॅपटॉप’सह (भ्रमणसंगणक) ३ भ्रमणभाष आणि संगणकाची ‘हार्डडिस्क’ जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे डी.आर्.डी.ओ.च्या अहवालातून समोर आले आहे. सध्या आतंकवादविरोधी पथकाच्या (ए.टी.एस्.) कह्यात असलेल्या या शास्त्रज्ञाकडून अन्वेषणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तसेच न्यायालयाने आरोपी कुरुलकर यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुरुलकर यांनी परदेशातील शत्रूराष्ट्रांसमवेत अनधिकृत संवाद साधल्याची माहिती डी.आर्.डी.ओ.ला मिळाली. त्यावरून कुरुलकर वापरत असलेल्या ‘लॅपटॉप’ आणि भ्रमणभाष यांची डी.आर्.डी.ओ.अंतर्गत न्यायवैद्यक पडताळणी करण्यात आली. या संदर्भात प्राप्त अहवालानुसार आरोपी कुरुलकर हे डी.आर्.डी.ओ.च्या संचालकपदी असतांना ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’ (पीआयओ) च्या सतत संपर्कात होते, तसेच त्यांनी शासकीय गुपिते आणि संवेदनशील माहिती ‘व्हॉट्सॲप मेसेज’, ‘व्हिडिओ’ आणि ‘व्हॉईस कॉल’द्वारे पाकिस्तानच्या हस्तकाला दिल्याचे समोर आले आहे.