गोरखपूर (उत्तरप्रदेश) – गीता प्रेस जगातील एकमेव मुद्रणालय आहे जी केवळ एक संस्था नाही, तर श्रद्धास्थान आहे. याचे कार्यालय जगातील कोट्यवधी लोकांसाठी मंदिरासमान आहे. तिच्या नावामध्ये गीता आणि कामामध्येही गीता आहे. जेथे गीता आहे, तेथे कृष्ण आहे. जेथे गीता आहे तेथे ज्ञान आहे. ज्ञान असेल, तर बोध असेल आणि बोध असेल, तर शोध असेल, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गीता प्रेस’विषयी येथे काढले. गीता प्रेसच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. त्या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल याही या वेळी उपस्थित होत्या. या प्रसंगी पंतप्रधानांनी गीता प्रेसला ‘गांधी शांतता’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच गीता प्रेसच्या ‘शिवपुराण’ आणि संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशनही केले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
गीता प्रेस भारताला त्याच्या जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करून राष्ट्रसेवेचे काम करत आहे. म. गांधी यांचेही गीता प्रेसशी भावनात्मक संबंध होते. ते गीता प्रेसच्या ‘कल्याण’ नियतकालिकात लिखाण करत होते. म. गांधी यांनीच म्हटले होते की, यात विज्ञापन प्रसिद्ध करू नये. आजही या नियतकालिकात विज्ञापने प्रसिद्ध केली जात नाहीत.
गीता प्रेसने अल्प मूल्यामध्ये धार्मिक पुस्तके घरोघर पोचवली आहेत. गीता प्रेससारखी संस्था केवळ धर्म आणि कर्म यांनाच जोडत नाही, तर ती भारतालाही जोडते. भारतात तिच्या २० शाखा आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये भारताचे मूळ चिंतन लोकांपर्यंत ती पोचवते.
विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.