इतिहास
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.
सण साजरा करण्याची पद्धत
प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच
लक्ष्मीपूजन
कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व
सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
श्री लक्ष्मीदेवीला करावयची प्रार्थना
प्रार्थना करतांना
जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे.’
माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. तेव्हा तोही भागीदार आहे. मी वर्षभरात काय मिळविले आणि त्याचा विनियोग कसा केला, त्याच्या पै पैचा हिशोब या जमा-खर्चाच्या वहीत नमूद केला आहे. तो आज तपासणीसाठी तुझ्यासमोर ठेवला आहे. तू साक्षी आहेस. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. तू माझ्याजवळ आल्यापासून मी तुझा मानच राखला आहे. तुझा विनियोग प्रभूकार्यासाठीच केला आहे; कारण त्यात प्रभूचाही वाटा आहे. हे लक्ष्मीदेवी, तू निष्कलंक आणि स्वच्छ अशी आहेस, त्यामुळे मी तुझा उपयोग वाईट कामात कधीही केला नाही.
हे सर्व मला श्री सरस्वतीदेवीने केलेल्या साहाय्यामुळेच शक्य झाले. तिने माझा विवेक कधीही ढळू दिला नाही. त्यामुळेच माझे आत्मबल कमी झालेे नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समाधान लाभले. हा खर्च मी प्रभूचे स्मरण ठेवूनच केला. (स्मरणाद्वारे) त्याला सहभागी करून घेतले असल्यामुळेच त्याचेही सहकार्य लाभले आहे. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. माझ्या नजरेस काही चूक आल्यास मी ती पुढे होऊ देणार नाही. तेव्हा हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या.
आध्यात्मिक महत्त्व : अशाप्रकारे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते. त्यामुळे धनामुळे निर्माण होणारा उन्माद त्याच्यात निर्माण न होता त्याच्या वागण्यात विनयशीलता येते.
संदर्भ व अधिक माहिती – सनातन संस्था