नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ४ जानेवारी २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय डिसेंबरच्या अंतीम टप्प्यात फेरआढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून घेण्यात येणार आहे.

याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, ‘ जिल्ह्यातील लोतप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे.

या चर्चेतूनच जोखीमेची शक्यता पाहता शाळा सुरू न करता तूर्तास संस्थगित ठेवणे योग्य राहिल असा सूर सर्वांचा दिसून आला.’ अशी माहिती ट्विटद्वारे दिली.

‘आजपर्यंत आपण सर्वसाधारण रूग्णांसाठीच्या कोरोना संसर्गाची लक्षणे व गुणधर्म यावर आधारित आपली आरोग्य सेवाविषयक क्षमतावृद्धी केली आहे. बालकांच्या अनुषंगाने व येणाऱ्या लाटेची गुणधर्म व शक्यतांच्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतांची चाचपणी करूनच शाळा सुरू करणेबाबत निर्णय घ्यावा असे वाटते.’

‘शहरी भागातील पालकांमध्ये शाळा सुरू करणेबाबत फारशी अनुकुलता दिसून येत नाही. तर ग्रामीण भागात ५० टक्के लोकांमध्ये ती अनुकुलता दिसून येते. अशाही परिस्थितीत उद्यापासून शाळा सुरू केल्याच तर, सुट्ट्या वगळता १८ दिवस शाळा सुरू राहतील. त्यात अर्धे विद्यार्थी ९ दिवस आणि उरलेले अर्धे ९ दिवस शाळेत येतील या पार्श्वभूमीवर केवळ ९ दिवसांसाठी शाळा सुरू करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत.’ असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.