जयपूर (राजस्थान) – देशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये शिक्षणाचा ताण आणि मैदानी खेळ यांपासून दूर राहिल्याने अनुमाने ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये ताण अन् उच्च रक्तदाब आढळून आला.
यांपैकी ३२ टक्के शहरी आणि २८ टक्के मुले ग्रामीण भागांतील आहेत. १० वर्षांपूर्वी केवळ ५ ते ७ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये ही लक्षणे दिसून येत होती. त्यातही ग्रामीण मुलांचे प्रमाण केवळ १ टक्के इतकेच होते. १५ ते १९ वयोगटांतील ४०० मुलांचे सर्वेक्षण करण्यात आल्यावर ही माहिती समोर आली.
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम्.बी.बी.एस्.चे शिक्षण घेणार्या १८ ते २५ वयोगटांच्या ४५० विद्यार्थ्यांपैकी ५५ जणांचा रक्तदाब उच्च असल्याचे आढळून आले. ताण आणि उच्च रक्तदाब आढळलेल्या मुलांमध्ये शैक्षणिक ताण अन् स्मार्टफोनमध्ये व्यग्र रहाणे, यांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले.