नाशिक – पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले. पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड येथे भेट देऊन स्ट्रॉंगरूम व मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत एस. चोक्कलिंगम यांनी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. भारत निवडणूक आयोगाकडूनही मतदानासाठी आवाहन करणारे मेसेज केले जात आहेत. मतदान केंद्रे आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज ठेवावीत. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, नाशिक म हानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.