पुणे – माहिती तंत्रज्ञान आस्थापनांसह बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बी.पी.ओ.) आणि नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग के.पी.ओ.च्या कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी घरून काम करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. वर्क फ्रॉम होमला कायदेशीर दर्जा मिळाल्याने आस्थापनातील कर्मचार्‍यांना अधिकृतपणे हा पर्याय देऊ शकतील. तरी यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकताही तज्ञ व्यक्त करीत आहेत. या निर्णयांचा अनेकांवर परिणाम होणार आहे.

या क्षेत्रातील नोकरदारांना कामावर जावे लागणार नसले, तरी त्यांना कायमस्वरूपी घरातून काम करण्यासाठी काही पालट करावे लागतील. तर वर्क फ्रॉम होम यशस्वी होण्यासाठी इंटरनेटची बँड विड्थ वाढवणे आणि कॉल ड्रॉपसारख्या समस्यांवर तातडीने उत्तर शोधणे आवश्यक आहे, असे आयटी तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले.

नवीन नियमांमुळे महानगरांमध्ये केंद्रीत असलेला आयटी उद्योग देशभरात विस्तारून रोजगार वाढतील. प्रतिभावान तरुणांची क्षमता, तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगाला प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून भारताची ओळख निश्‍चितच वाढेल आणि आत्मनिर्भर भारत साकारण्यास मदत होईल, असे नेसेन्ट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सीनेटचे अध्यक्ष हरप्रीत सलुजा यांनी सांगितले.