महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश आणि जाहिराती मराठीतच लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असून तिला अभिजात दर्जा प्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर, आता वाहनांवरील संदेश देखील मराठीत असावेत असा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यावसायिक वाहनांमध्ये ट्रक, ट्रॅक्टर आणि व्यवसायिक उद्देशाने खरेदी केलेली इतर वाहने समाविष्ट आहेत. याशिवाय, परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये वापरली जाणारी वाहने देखील या नियमाच्या कक्षेत येतील. याआधी अनेक व्यावसायिक वाहनांवरील संदेश इंग्रजी किंवा हिंदी भाषेत लिहिले जात होते. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रसारावर परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा व्यापक प्रचार होईल. तसेच, येत्या गुढीपाडव्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. परिवहन आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्रात नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठीतच लिहिणे बंधनकारक असेल.
या निर्णयामुळे मराठी भाषेच्या सशक्तीकरणाला अधिक चालना मिळणार आहे, तसेच व्यावसायिक वाहनांद्वारे होणाऱ्या जनजागृती मोहिमांमध्ये स्थानिक भाषेचा अधिक प्रभाव दिसून येईल.