Image by Satya Tiwari from Pixabay

मोसमी पाऊस ७ दिवस उशिराने केरळमध्ये येऊन धडकला आहे. केरळमध्ये १ जून या दिवशी पोचणारा मोसमी पाऊस यावर्षी १ आठवडा उशिरा पोचला आहे. पुढील ५ दिवसांत तो गोव्यात पोचण्याची शक्यता आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या गोमंतकियांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने घोषित केले आहे की, दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे सरकला आहे. लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तमिळनाडू, मन्नारची खाडी आणि बंगालच्या खाडीचा बहुतांश भाग पावसाळी ढगांनी व्यापला आहे. मोसमी पाऊस पुढील ४८ घंट्यांत अरबी समुद्राचा मध्य, केरळचा उर्वरीत भाग, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांचा काही भाग अन् बंगालच्या खाडीचा मध्य आणि ईशान्येकडील भाग येथे सरकण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील ४-५ दिवसांत गोव्यात मोसमी पावसाचे आगमन निश्चित आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढणार
अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळाने मोसमी पावसाचा मार्ग अडवला होता. आता हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने गेल्यामुळे केरळमधील मोसमी पावसाचा मार्ग मोकळा झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ ८ जूनला सकाळी ६ घंट्यांत मध्यपूर्व अरबी समुद्रातून उत्तरेकडे ५ कि.मी. प्रतिघंटा या गतीने सरकले असून सध्या ते गोव्याच्या दक्षिण-पश्चिम किनार्‍यापासून ८५० कि.मी. अंतरावर आहे. पुढील २४ घंट्यांत त्याची तीव्रता वाढणार असून ते पुढील ३ दिवसांत आहे तेथून उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकणार.