कुडाळ – “देशावर होणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला जशास तसे उत्तर दिले जाईल. पाकिस्तानधार्जिण्या आतंकवाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य धडा शिकवतील,” असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या आभार सभेत शिंदे बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कोकणवासीयांनी दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल त्यांनी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. या सभेसाठी येताना ते पहिल्यांदा पहलगाम येथे गेले होते, जिथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिकांना धीर देण्यासाठी त्यांनी भेट दिली होती.
“पहलगाम येथील हल्ला हा संपूर्ण देशावर झालेला आक्रमण आहे. काश्मीरमध्ये लोकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे, आणि हे आतंकवादी कृत्य निष्फळ ठरवले जाईल,” असेही शिंदे म्हणाले.
सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणच्या विकासासाठी अखंड प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. “कोकणी माणसाने आम्हावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आगामी काळातही तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी अशीच ठामपणे उभे राहा,” असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या कार्याचेही कौतुक केले. “शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यापासून नीलेश राणे यांनी फक्त कामावर आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अडचणीच्या वेळी धावून जाणारा आणि स्वाभिमानाने उभा राहणारा तो खरा शिवसैनिक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आमदार राणे यांचे अभिनंदन केले.
सभेमध्ये आमदार नीलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली.