वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

35

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्याेदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्याेदयापर्यंत’, असा आहे. होरा म्हणजे घंटा. अहोरात्र म्हणजे २४ घंटे. प्रत्येक होरा एकेका ग्रहाचा असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्याेदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला दिलेले आहे. वाराचा प्रारंभ सूर्याेदयी होतो. ‘मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:’ याचा अर्थ मंद गतीच्या ग्रहापासून शीघ्र गतीच्या ग्रहापर्यंत होरे चालू असतात. पृथ्वीच्या अंतर्कक्षेमधील बुध आणि शुक्र ग्रह यांची भ्रमणगती अधिक आहे. पृथ्वीच्या बाह्य कक्षेतील ग्रह जसजसे दूर आहेत, तसतशी त्यांची गती मंद होत जात असल्याने त्यांना ‘मंद ग्रह’ म्हणतात, उदा. शनि या मंद ग्रहाला एका राशीचे भ्रमण पूर्ण करण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. चंद्र (सोम) या शीघ्र ग्रहाला एका राशीचे भ्रमण पूर्ण करण्यास सव्वा दोन दिवसांचा कालावधी लागतो. ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीवरून त्याचे राशीतील भ्रमण समजते.

मंद ग्रह ते शीघ्र ग्रह यांचा क्रम – शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम), उदा. शनिवारी पहिला होरा (घंटा) शनि या ग्रहाचा, दुसरा गुरु, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध, सातवा चंद्र या ग्रहाचा असतो. याप्रमाणे तीन वेळा, म्हणजे २१ होरे (तास) झाल्यावर २२ वा पुन्हा शनीचा, २३ वा गुरुचा आणि २४ वा मंगळाचा, असे २४ घंटे पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सूर्याेदय होतो, तो पुढील होर्‍याने. यानुसार शनिवारनंतर रविवार येतो.

— सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. संदर्भ – दैनिक सनातन प्रभात