पाकिस्तान सरकार देशात आणीबाणी लागू करण्याच्या विचारात !

10

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत देशात आणीबाणी लागू करण्याचा सल्ला दिला आहे. ९ मे या दिवशी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार झाला. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान शहबाज म्हणाले की, इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ हे दोघेही खोटारडे आहेत. ते देशाला विनाशाकडे नेत आहेत. यापूर्वीच देश अनेक आव्हानांचा सामना करत आहे. आपले चलन मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इम्रान खान यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेतच्या करारांचे उल्लंघन केले आहे. आता त्यांच्या सरकारची चूक दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान शरीफ यांनी या वेळी न्यायालयावरही टीका केली. ते म्हणाले की, इम्रान खान यांच्या सरकारने आमच्या पक्षाच्या नेत्यांवर सूड उगवला होता, तेव्हा न्यायालये शांत होती. जेव्हा आम्हाला कारागृहांत पाठवले जात होते, तेव्हा न्यायालयांनी याची नोंद घेतली का ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.