नाशिक – शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असून या घटनांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला केली जाते. मात्र अनेकवेळा योग्य माहिती न मिळाल्याने तपास नीट होत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून आत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या सर्वच रस्ते अपघातांच्या प्रकरणात आता पोलीसच फिर्यादी होणार आहेत.
यात प्राथमिक चौकशी पासून ते गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारे फिर्याद पोलीस दाखल करणार आहेत.
त्यामुळे आयुक्तांनी वरील आदेश काढून तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना केल्या आहेत. शहरात दाखल होणाऱ्या फेटल व मोटार अपघातांमध्ये जखमीच्या नातेवाईकांना फिर्यादी केले जाते, हे सुसंगत नसल्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे निरीक्षण आहे. अपघाताची प्राथमिक चौकशी प्रशिक्षित पोलीस म्हणून अंमलदार करतात किंवा अधिकारी करतात. अपघात कसा झाला, याची माहिती वाहतुकीचे नियम वाहन कायदा याची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांपेक्षा पोलिसांना अधिक असते. त्यासाठी अपघाताची प्राथमिक चौकशी पोलिसातर्फे करण्यात येते. तर चौकशीची संबंध नसलेल्या व्यक्तीला फिर्यादी केल्यास दोषारोपसिद्धी दरम्यान अडचण निर्माण होते. त्यामुळे यापुढे शहरात प्रत्येक अपघाताच्या गुन्हा तपासणीसाठी पोलीस स्वतःहून फिर्याद देतील. यासंदर्भात स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी निर्गमित केले असून सर्व पोलीस ठाण्यांमधून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.