महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या अनेक कल्याणकारी आहेत. यापैकीच एक प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेतून पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत रू. 5000 चे आर्थिक सहाय्य दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. तसेच, सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार दुसरे अपत्य मुलगीच असल्यास आता अशा महिलांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रू. 8 लाख पेक्षा कमी आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, ज्या महिला अंशतः (40 %) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन), बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला, आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी, ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी आहेत.
केंद्र शासनाच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत रू. 5000 चे आर्थिक सहाय्य दोन टप्प्यांमध्ये जाते. यासाठी मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेमध्ये गरोदरपणाची नोंदणी आणि प्रसूती पूर्व किमान एक तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र, प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे.
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार दुसरे अपत्य मुलगीच असल्यास दुसऱ्या अपत्यासाठी रु. 5000 चा लाभ बाळाच्या जन्मानंतर जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात दिला जातो. जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्ये झाली असतील आणि त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ मिळेल.