द्रमुक आणि काँग्रेस यांचा विरोध
लोकसभेच्या ७ व्या आणि अंतिम टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार ३० मेच्या सायंकाळी संपला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४८ घंट्यांसाठी मौन धारण करत तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मारकाच्या ठिकाणी जाऊन ध्यानधारणा प्रारंभ केली आहे. यावरून तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकने या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. यासह काँग्रेसने म्हटले आहे की, प्रचार संपल्यानंतरच्या शांतता कालावधीत अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या प्रचार करण्यास मनाई असते. तरीही पंतप्रधानांनी आचारसंहिता नियमाला बगल दिली आहे.
द्रमुककडून न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीच्या पत्रात, ‘विवेकानंद स्मारकात ध्यान करण्यासाठी पंतप्रधानांना संमती देऊ नये, तसेच ध्यानधारणेचे प्रसारमाध्यमांवरून प्रसारण केले जाऊ नये’, अशी मागणी केली आहे.