News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे प्रकट झाले. त्यांची दृष्टी पूर्णतः अंतर्मुख होऊन नासिकाग्रावर स्थिर झालेली होती. नेहमीच दिगंबर अवस्थेत असणार्‍या महाराजांना कुणी कपडे घातलेच, तर ते लगेच काढून फेकून देत किंवा गर्दीतील लोकांना वाटून टाकत असत. त्यांच्या आरंभीच्या वेशानुसार त्यांच्या अंगात जुनी बंडी, हातात कमंडलूसारखा भोपळा आणि स्वहस्ते सिद्ध केलेली कच्च्या मातीची एक चिलीम होती.

संत श्री गजानन महाराज

त्यांचे सत्यस्वरूप कोणताही कॅमेरा टिपू शकला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे; म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसर्‍या छायाचित्राशी जुळत नाही.

प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात ? याचीच ही प्रचीती आहे. महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत. खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे । चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥ हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे.
महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. गण गण गणांत बोते असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात. भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे.

संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ