News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’चे भविष्य धोक्यात आले असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. या ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’मध्ये बहुतेक मूळ भारतीय वंशाचे आहेत.

या तरुणांना दिलासा मिळावा, यासाठी अमेरिकेचा ‘चिल्ड्रन अ‍ॅक्ट’ लवकरात लवकर संमत करण्याची मागणी अमेरिकेच्या सरकारकडे केली जात आहे. ‘इंप्रूव्ह द ड्रीम’ संघटनेचे संस्थापक आणि भारतीय वंशाचे दीप पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेचा ‘चिल्ड्रन अ‍ॅक्ट’ लवकरात लवकर संमत करण्याची आणि ही समस्या कायमची संपवण्याची वेळ आली आहे. या अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’ पैकी ९० टक्के मुले विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचे शिक्षण घेत आहेत. यावर्षीही ‘चिल्ड्रन अ‍ॅक्ट’ संमत झाला नाही, तर १० सहस्र तरुणांना अमेरिकेतून हद्दपार केले जाऊ शकते, असे दीप पटेल यांनी सांगितले.

‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’ म्हणजे काय ?
जगभरातील बरेच लोक ‘नॉन इमिग्रंट’ व्हिसावर किंवा दीर्घकालीन व्हिसावर अमेरिकेत काम करतात. या लोकांच्या मुलांना अमेरिकेत ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’ म्हणतात. वास्तविक ही मुले २१ वर्षांपर्यंत पूर्ण कायदेशीर अधिकारांसह अमेरिकेत राहून शिक्षण घेऊ शकतात. या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांची २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच नागरिकत्व मिळाले तर ठीक, अन्यथा या मुलांना अमेरिका सोडावी लागते.