News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

बेंगळुरू (कर्नाटक) – रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे. मंदिरात स्थापन करण्यात आलेली श्री रामलल्लाची मूर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामनवमीपूर्वी एका मुलाखतीत सांगितले की, लोक विचारत असलेले बहुतेक प्रश्‍न हे प्रभु रामाच्या डोळ्यांविषयी आहेत. त्यांना असे वाटते की, त्याचे डोळे त्यांच्याशी बोलत आहेत. म्हणून ते मला विचारतात की, ‘मी प्रभु रामाचे डोळे कसे बनवले ?’ माझे उत्तर नेहमीच हेच असते की, ते मी घडवले नाहीत. प्रभु रामानेच ते माझ्याकडून घडवून घेतले आहेत.

मूर्ती १०० टक्के लोकांना आवडली !

शिल्पकार योगीराज म्हणाले की, कोणत्याही कलाकृतीवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते; मात्र प्रभु रामाची मूर्ती घडवतांना असे काहीही घडले नाही. त्याला लोकांकडून प्रेम आणि दाद मिळाली. कलेच्या क्षेत्रात ७० टक्के लोकांना तुमचे काम आवडते आणि ३० टक्के लोकांना आवडत नाही; पण येथे मला १०० टक्के लोकांचे प्रेम आणि कौतुक मिळाले आहे. माझ्यावर एक टक्काही टीका झाली नाही.

मला मूर्ती जिवंत करायची होती !

मी भक्तांच्या दृष्टीकोनातून काम करत होतो. मला परमेश्‍वराची मूर्ती जिवंत करायची होती. त्यासाठी मी ७ महिने अथक परिश्रम घेतले. माझ्यासाठी हे अवघड नव्हते, तर माझ्यासाठी एक संधी होती. भगवंताच्या आशीर्वादानेच मला त्याची मूर्ती बनवण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.

मूर्ती घडवतांना सात्त्विक आहार घेतला !

योगीराज म्हणाले की, मूर्ती बनवतांना खाण्यावर काही बंधने आली होती. जेवण कमी तेल आणि कमी मिरची वापरून शिजवले जात होते. सकाळी मला प्रथिने म्हणून डाळी दिल्या जात होत्या. मी सात्त्विक अन्न ग्रहण करत होतो.