News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला राज्याचे दिवंगत महसूलमंत्री आणि विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्मरणार्थ हा प्रस्ताव अधिसभेत रविवारी मांडण्यात आला, आणि तो सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. मौजे शिवनई येथे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली असून, लवकरच तिचे लोकार्पण होणार आहे. त्याचवेळी अहिल्यानगर येथील उपकेंद्राला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अधिसभा सदस्य डॉ. अपूर्व हिरे, अशोक सावंत, डॉ. संपत काळे, आणि डॉ. चिंतामणी निगळे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या निर्णयामुळे शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कार्याचा गौरव होणार आहे.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे अमूल्य योगदान

नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणीही अधिसभेत करण्यात आली असून, पुढील एक ते दीड महिन्यात हे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे १९५२ मध्ये राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतरही शिक्षण क्षेत्रासाठी त्यांची तळमळ कायम होती. विद्यापीठाला जागेची कमतरता भासल्याने त्यांनी वार्षिक फक्त एक रुपया भाडे करारावर जवळपास ४०० एकर जागा आणि त्या काळातील व्हाईसरॉयचा बंगला प्रशासकीय इमारतीसाठी उपलब्ध करून दिला. आजही विद्यापीठाचे प्रशासन त्याच इमारतीत कार्यरत आहे.

शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या ब्रीदवाक्याने सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कार्याला या निर्णयामुळे मोठा सन्मान प्राप्त झाला आहे.